Asmita Gokhale
Asmita Gokhale
2d agoMulund East, Mumbai Suburban, Maharashtra

*चिमुकल्या हातांनी मातीशी जोडले नाते!* अथक फाउंडेशन आणि पर्यावरण गतिविधीतर्फे SMPR शाळेत बीजगोळे निर्मितीचा उपक्रम. निसर्गाशी नाते जोडण्यासाठी मोठ्या उपक्रमांची गरज नसते. कधी एखादे बी हातात घेणे आणि मातीला स्पर्श करणे, एवढी साधी कृतीही मुलांच्या मनावर निसर्गप्रेमाचा संस्कार करून जाते. अथक फाउंडेशन आणि पर्यावरण गतिविधी यांच्या वतीने आज SMPR School and Junior College मधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बीजगोळे (Seed Balls) तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातील सर्वात आनंददायी क्षण म्हणजे अनेक मुलांनी पहिल्यांदाच मातीला प्रत्यक्ष हात लावला. सुरुवातीला काही मुले प्लास्टिकच्या पिशव्या किंवा हातमोजे घालून आली होती. मात्र ते बाजूला ठेवून जेव्हा त्यांनी माती हातात घेतली आणि स्वतःच्या हातांनी बीजगोळे तयार केले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहण्यासारखा होता. जन्मापासून मृत्यूपर्यंत मातीशी आपले अतूट नाते असते. मात्र आजच्या जीवनशैलीत मुलांचा मातीशी होणारा थेट संपर्क कमी होत आहे. त्यामुळे त्यांना मातीचा स्पर्श, बीजाचे महत्त्व आणि निसर्गाशी असलेले आपले नाते अनुभवता यावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. बीजगोळे तयार करताना गुंज, बारिंग्टोनिया, जांभूळ, फणस तसेच विविध जंगली व फळझाडांच्या बियांचा वापर करण्यात आला. प्रत्येक बीचे नाव विचारत, त्याची ओळख करून घेत मुले उत्साहाने बीजगोळे तयार करत होती. या उपक्रमातून मुलांना केवळ बीजगोळे तयार करण्याचा अनुभव मिळाला नाही, तर बीजापासून झाडापर्यंतचा निसर्गाचा प्रवास समजून घेण्याची एक छोटीशी संधी मिळाली. चिमुकल्या हातांनी मातीला दिलेला हा स्पर्श आणि बीजांमध्ये पेरलेली ही आशा भविष्यात नक्कीच हिरवाईत रूपांतरित होईल. *मातीशी नाते जोडा, बीज जपा*. आणि *उद्याच्या हिरव्या भविष्याची पेरणी करा!*

8 comments

No comments yet