
*कुदळ-फावडे हाती घेत विद्यार्थ्यांनी अनुभवली श्रमाची गोडी* पडेगावच्या जनसहयोग वनोद्यानात पाच तास श्रमदान व वृक्षारोपण पुस्तकातील पर्यावरणाचे धडे प्रत्यक्ष कृतीतून अनुभवत पी.यू. जैन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पडेगाव येथील जनसहयोग पर्यावरण संवर्धन संस्थेच्या विविध वाटिकांनी समृद्ध वनोद्यान परिसरात सुमारे पाच तास श्रमदान व वृक्षारोपण केले. कुदळ, फावडे, खुरपे, विळा व टोपल्या हाती घेत विद्यार्थ्यांनी माती भरणे, तण काढणे, आळी करणे, खड्डे तयार करणे, रोपे व बियांची लागवड, पाणी देणे तसेच खतांच्या मात्रा देण्याची कामे प्रत्यक्ष केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या सुमारे २५ एकर परिसरात २० पेक्षा अधिक विविध वाटिका आणि सुमारे ४०० प्रकारच्या वृक्ष-वनस्पतींचे संवर्धन करण्यात आलेले आहे. सन २०१९ मध्ये सुरू झालेल्या या हरित उपक्रमाने आज या परिसराचे रूपांतर समृद्ध वनोद्यानात केले आहे. जनसहयोगाचे प्रमुख प्रशांत गिरे, संदीप व रोपवाटिकेतील महिला वृक्षसंवर्धिकांनी विद्यार्थ्यांना विविध वनस्पती, पक्षी व प्राणी यांची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृक्षसंवर्धनविषयक राजाज्ञेचे वाचन करून पर्यावरण रक्षणाचा ऐतिहासिक संदेशही देण्यात आला. दिवसभराच्या श्रमानंतर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या वनभोजनाने श्रमाची खरी गोडी अनुभवली. गेल्या १३-१४ वर्षांपासून प्रशांत गिरे व सहकाऱ्यांनी उभारलेल्या या हरित चळवळीची माहिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक विजय पाटोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महावीर संगवे, विशाल पाटणी, सुलभा आहेरकर व नीरज कासलीवाल यांनी परिश्रम घेतले.

