*प्रकृतीला वंदन करून वादनाचा श्री गणेशा ..!* पर्यावरण संरक्षण गतिविधि च्या संकल्पनेतून ऐरावत ढोल ताशा ध्वज पथक आणि टीम युवा फॉर नेचर यांच्या मार्फत भाग्यश्री नगर एन आय टी मैदान, हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या मागे प्रकृती वंदन, वृक्षारोपण तसेच वृक्ष रक्षाबंधन हा नाविन्यपूर्ण उपक्रम मोठ्या संख्येने उपस्थित युवा शक्ती आणि वादकांच्या उपस्थित पार पाडला. रा. स्व. संघाचे नागपूर महानगर सहकार्यवाह दिनेश जी गौर यांच्या प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शनामध्ये सुरुवातीला प्रकृती वंदनची पार्श्वभूमी आणि ऐतिहासिक माहिती देऊन उपक्रमाला सुरुवात झाली. ऐरावत ढोल ताशा पथकचे वादनाचे हे पहिलेच वर्ष असून छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थानी ठेऊन पथक यापुढे कार्य करणार आहे तसेच पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी आणि बांधिलकी स्वयं प्रेरणेने जागृत होऊन समाज जागरण करणार आहे. आजच्या उपक्रमात प्लास्टिक कचरा गोळा करून त्यापासून इको ब्रिक्सची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे याच इको ब्रिक्सचा वापर तशा सराव करण्यासाठी सुद्धा केला जातो. सोबतच प्रकृती वंदन आणि वृक्ष रक्षाबंधन हा कार्यक्रम सुद्धा पार पडला ज्यात पथकातील मातृशक्ती आणि भगिनींनी झाडांना रक्षा सूत्र बांधून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. पर्यावरण संरक्षण गतिविधिचे नेताजी चिंचुलकर यांनी रान भाज्या आणि आपल्या आहारातील विविधता कशा प्रकारे आपली रोज प्रतिकार शक्ती वृद्धिंगत करते यावर मार्गदर्शन केले. युवा शक्ती कार्यविभाग विदर्भ प्रांत संयोजक लोकेश मुंदाफळे यांनी येणाऱ्या काळात पर्यावरण उपक्रम जसे की कंपोस्ट खत निर्मिती, गच्चीवरील बाग अशा विविध कार्यशाळा राबविण्याबद्दल माहिती दिली. पथकातील ढोल आणि ताशा वादक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच त्यांनी गट स्तरावर वृक्षारोपण, प्लास्टिक संकलन आणि इको ब्रिक्स निर्मिती केली. प्रकृती गीत गाऊन उपक्रमाची सांगता झाली. विशेष म्हणजे येणाऱ्या काळात ऐरावत ढोल ताशा पथक आपले पहिले मानाचे वादन हे प्रकृतीला मान वंदना म्हणून अर्पण करणार आहे. ज्यात सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करू याबद्दल सामाजिक संदेश दिला जाणार आहे.

