
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात महावृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न महाविद्यालयाच्या १०४ व्या वर्षानिमित्त १०४ वृक्षांची लागवड छत्रपती संभाजीनगर, दि. ५ ऑगस्ट : शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या १०४ व्या वर्धापन वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री. शिवराज भैय्या भुमरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात "महावृक्षारोपण सोहळा–२०२६" उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या १०४ वर्षांच्या गौरवशाली परंपरेचे औचित्य साधत परिसरात विविध प्रजातींच्या १०४ वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. वैशाली देशमुख या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा. विभागीय आयुक्त (IAS) श्री. मधुकरराव अर्दंड तसेच मा. श्री. शिवराज भैय्या भुमरे, जिल्हा परिषद सदस्य, उपस्थित होते. आपल्या मनोगतात श्री. मधुकरराव अर्दंड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. मा. श्री. शिवराज भैय्या भुमरे यांनी आपल्या प्रतिष्ठानामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व युवक विकासाच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. वैशाली देशमुख यांनी पर्यावरण संरक्षणाबरोबरच अमली पदार्थमुक्त समाजाची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी, सुदृढ व जबाबदार नागरिक म्हणून समाजात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः अमली पदार्थांपासून दूर राहण्याबरोबरच इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाविद्यालयाच्या १०४ वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश काळण यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या १०४ व्या वर्षानिमित्त "१०४ वर्षे – १०४ वृक्ष" हा संकल्प विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे सांगितले. प्रत्येक स्वयंसेवकाने स्वतः लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच श्री. शिवराज भैय्या भुमरे प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. प्रितेश काळण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

