Abhijit Deshpande
Abhijit DeshpandeModerator
2y ago

वृक्षमित्र कट्टा वर्षासहल - २८ जुलै २०२४ - सातीवली - लेले पाडा(बोरांडा) - ग्रीन अंब्रेला.

सहलीचे फोटो/व्हिडिओ - photos.app.goo.gl/yHdSXCM2h2h22dw6A यंदाचे वर्षासहलीचे तिसरे वर्ष. योगायोगाने जुलैच्या कट्ट्यावर श्री. किरण लेले वक्ते म्हणून आले होते, त्यामुळे त्यांच्या रोहिणी कृषी पर्यटन, लेले पाडा, बोरांडा येथील शिवारालाच जाऊ असा सगळ्यांनी आग्रह धरला. पावसाळी दिवस, खड्डेमय रस्ते, ट्रॅफिक ह्या सगळ्यांचा विचार करता शिवार फेरीसोबत, NH 48 ला लागून सातीवली येथील गरम पाण्याची कुंड आणि ग्रीन अंब्रेला ह्यांची वसई येथील नर्सरी बघता येईल असा प्लॅन नक्की केला. आठ दिवसात ३९ जणांनी नोंदणी केली, त्यामुळे आमची ४० सीटर बस बुक प्रफुल्ल कोंडेकरच्या ओळखीने बुक केली, आणि सहलीच्या इतर व्यवस्थाना गती आली. व्यवस्थांचा कुणावर ताण पडू नये पण नियोजन चोख असावे म्हणून आम्ही ४ गट केले, गंमत म्हणून गटाला सोनचाफा, गोकर्ण, मोगरा आणि गुलाब अशी फुलांची नावे दिली. श्रीधर जोशी, किरण सैतवडेकर, डॉ. शेफाली माने व सौ. चारू कुलकर्णी यांनी ग्रुप लीडर म्हणून जबाबदारी घेतली. नाश्त्याची जबाबदारी संजीव होंकण ह्यांनी घेतली तर चहा आणि संध्याकाळच्या स्नॅक्सची व्यवस्था गौरव जोशीने बघितली. एकूण काय सर्व व्यवस्था आदल्या दिवशीच पूर्ण झाल्या होत्या. सकाळी ठीक ६ वा. गौरवने बस समोर नारळ वाढवला, एकदा नोंदणीप्रमाणे हजेरी घेतली , गणपती बाप्पा मोरया झाले आणि ६.१० वा. आम्ही गोरेगाव सोडले. दहिसर सोडल्यावर गौरवने "आम्ही बी घडलो ", " स्वतंत्रता का अमृत उत्सव" , मी ' देश हमे देता है सबकुछ "अशी गीते म्हंटली. चारू ताईंनी " या गो दांड्यावरी" हे कोळी गीत म्हंटले, तर डॉ शेफाली यांनी "बडे अच्छे लगते हो " हे रोमँटिक साँग म्हंटले. परफॉर्मन्स करणाऱ्या प्रत्येकाला फुलझाडे/भाज्यांच्या बिया बक्षीस म्हणून ठेवल्या होत्या. वरुणराजांची मेहरबानी आणि विशेष ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही सातीवलीला ८ वाजता पोहोचलो. बस मोठी असल्यामुळे थोडी अलीकडे थांबवली. कुंडात जाण्यासाठी आता प्रतिमाणशी रू.१० शुल्क सुरू झाले आहे. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी कुंड आहेत. कुंडात उतरल्या उतरल्या अरविंद सुतार ह्यांनी छान शंखनाद केला. आम्ही बरेच जण पाय शेकत कठड्यावर बसलो, पण श्री आणि किरण ने चक्क पोहाणीच केली. तशी तीन कुंड होती, पण पहिल्या कुंडातील पाणी सर्वात गरम होते. मनसोक्त डुंबल्यावर परत आलो. बसमध्ये नाश्ता केला ( मधुराच्या वझ्यानी उपमा छान पॅक करून दिला होता) केला आणि लेले पाड्याकडे निघालो. मनोर नाक्यानंतर विक्रमगड रोडला ५ मिनिटांवरच रोहिणी कृषी पर्यटनाचा बोर्ड दिसला. ९.४५ च्या सुमारास आम्ही "गोपाल की भूमी" ( किरण लेले ह्यांनी आपल्या घर आणि वाडीला दिलेले नाव) मध्ये प्रवेश केला. गेट मध्ये ग्रुप फोटो काढले आणि लेल्यांच्या घराच्या पुढच्या पडवीत मांडलेल्या खुर्च्यांवर स्थिरावलो. तसे माझा मित्र प्रवीण खाडिलकर सोडला तर बाकी सगळे गोरेगावकर होते पण सगळ्यांचा फॉर्मल परिचय नव्हता. शिवारफेरी ११ वा. सुरू करण्याचे ठरले होते, त्यामुळे सहलीला आलेल्या सगळ्यांनी आपापला परिचय करून दिला. प्राउड गृहिणी, डॉक्टर, शिक्षक, आयटी, फार्मा, योग शिक्षक, निवृत्त पण सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत अश्या सज्जनांची मांदियाळीच भरली होती. सगळ्यांची कार्यक्षेत्र वेगवेगळी होती, पण वृक्ष किंवा निसर्ग प्रेमी हा सगळ्यांना जोडणारा दुवा होता. परिचय झाल्यावर आम्हाला "आंबील" ( नाचणी पिठाची कढी म्हणा ना) हे वेलकम ड्रिंक मिळाले. पावसाळी वातावरणात गरमागरम आंबील, सगळ्यांनाच आवडले, लेल्यानी समोर पातेलेच ठेवले होते, त्यामुळे बऱ्याच जणांची सेकंड राऊंड झाली. लेले कुटुंबीयांचा परिचय करून देताना स्वराली ( त्यांची मुलगी) उकडीचे मोदक करत आहे असे कळले, त्यामुळे पडवितून आम्ही मोर्चा थेट स्वयंपाकघरात वळवला. अगदी सिस्टीमॅटीक काम चालू होते. इंद्रायणी, जया आणि आंबेमोहोर अश्या तीन तांदुळाची मिळून पिठी बनवली होती. मोजून २७ ग्रॅमची लाटी घेऊन मग एका यंत्रात प्रेस करतात, त्यामुळे गोल एकाच मापाच्या पाऱ्या तयार होतात. दोन चमचे सारण घालून अगदी सुबक पाकळ्या (मोजून १५ किंवा १६) आणि मग शेंड्याला पिळून छान टोकदार नाक काढणे चालू होते. इतके सुबक मोदक LIVE बनवताना मी प्रथमच पहात होतो. मी स्वरालीला म्हंटले एवढे सुबक मोदक खाणे म्हणजे त्या मोदकांवर अन्याय होईल. मनाली शेलार यांनीही मोदक बनवण्याचा अनुभव घेतला. मोदकाची पाककृती बघून आम्ही घराच्या पश्चिमेकडून शिवारफेरीला सुरुवात केली. एकूण पावणे तीन एकरचा परिसर आहे. शिवारात फिरताना आपली ज्ञानेंद्रिये सुखावह कशी होतील याचा विचार केला गेला आहे, तसेच आध्यात्मिक दृष्ट्या आणि वाऱ्याच्या दिशेने ( Farm Architecture)झाडांची लागवड केली आहे. नैसर्गिक शेतीमध्ये फुलपाखरे आणि मधमाश्यांना खूप महत्व आहे. दोघांना आकर्षित करण्यासाठी फळझाडांच्या जोडीला फुलझाडे बरीच आहेत. चंदनाच्या झाडांवर तर आम्हाला अनेक विविध फुलपाखरे खूप मोठ्या संख्येने आढळली. मोनोक्रोपिंग न करता जैवविविधता आहे, अगदी आंब्याच्या बाबतीतही रायवळ, हापूस, केशर, नारळी , पायरी , मलकोबा अश्या विविध जाती आहेत. भातामध्येही जया, डांगी, काटे एचएमटी, काळ भात, सुरती कोलम असे वेगवेगळे प्रकार घेतले जातात. ह्या संपूर्ण परिसराला गोपाल भूमी म्हंटले असल्यामुळे कदंबासारखे वृक्ष आहेत. कृष्ण तुळशीला नमन करूनच शेतीचे दैनंदिन काम सुरू होते. कृष्ण तुळशीच्या जोडीला राम तुळसही आहे, पाने खूप मोठी आणि थोडी खरखरीत असतात. सीताफळ, कोकंब, केळी, चिंच, आवळा अशी पंचवीस प्रकारची फळझाडे आहेत. साधी हळद, आंबे हळद , सुरण, अननस, पाती चहा, कंदवर्गिय अशी विविध आंतर पिके घेतली जातात. तर पावसाळ्यात कुर्डू, कर्टू्ल, टाकळा, डिना, केनं, टेटू अश्या विविध रानभाज्यांचा महोत्सव घेतला जातो. तेथील शिवारात स्वप्नात सुद्धा रसायन वापरले जात नाही, ह्यामुळे गोबर,गोमूत्र ह्यावरच खत म्हणून भिस्त असते. एका डांगी जातीच्या गाईपासून सुरुवात करून आज १० पर्यंत गोधन ( गाय, वासरे , बैल) आहे. जीवामृत तयार केले जातेच शिवाय जवळपास ३० टन शेण मिळते ते प्रामुख्याने खत म्हणून वापरले जाते. पावणेतीन एकरातच शेवटी जवळपास १० गुंठे भूभाग जंगल ( देवराई ) म्हणून ठेवले आहे, जिथे कुणी जातही नाही आणि तेथील कुठलीच गोष्ट ( लाकुडफाटा, पालापाचोळा ) दैनंदिन वापरात घेतली जात नाही. उत्पत्ती, स्थिती, लय याचा सुरेख निसर्गातील संगम येथे बघायला मिळतो तसेच भरपुर पक्ष्यांचा निवास येथे असतो. गोशाळा बघून शिवारफेरीचा समारोप झाला. जेवण व्हायला १५ मिनिटे असल्यामुळे आम्ही काही जण जवळील ओढा, आणि निसर्गनिर्मित तलाव बघायला गेलो. आम्ही येईपर्यंत बुफे लागलेला होता आणि काही जणांनी उदरभरण सुरू केले होते. बहेतुक पदार्थ घरगुतीच जिनसांचे होते. ओतेले (तांदूळ उकडीच्या भाकऱ्या), अळवाचे फदफदे, केळ्याची भाजी, कुर्डू (रानभाजी) कोथिंबीर वडी ( कोथिंबीर भरपूर असलेली) , सॅलेड, लाल भात( पॅालीश नसलेला ), आमटी आणि उकडीचे मोदक व साजूक तूप. सगळ्यांनी स्वादिष्ट भोजनाचा मनसोक्त आनंद लुटला. एवढे साग्रसंगीत जेवण झाल्यावर वामकुक्षी पाहिजेच. काही जणांनी आराम केला तर काही जणांनी स्वराली बनवत असलेल्या प्रॉडक्टची ( ज्वारी बिस्किटे, नाचणी लाडू, मोदकपीठ, आंबील, मोरंबा, लोणची, देशी गाईचे तूप) खरेदी केली. २.४५ च्या सुमारास एक मोठी शिटी फुंकली आणि झोपलेल्याना जागे केले. आमचे काही ग्रुप फोटो काढले. किरणजीनी मला बागेत लावायला रिठा व टेटू ची रोपे आणि भेंडी, भोपळा यांच्या बिया दिल्या, तसेच प्रत्येकासाठी लाल माठाचे बियाणे आणि आंब्याच्या मोरंब्याची भेट दिली. ३.३० च्या सुमारास आम्ही बोरांडा सोडले. ट्रॅफिक खूप असेल असे वाटत होते, पण एक दोन स्पॉट सोडले तर विशेष ट्रॅफिक नव्हते. सौ. चारू कुलकर्णी यांनी काही वस्तू पिशवीत भरून आणल्या होत्या, त्या पिशीवतून न बघता वस्तू काढायची आणि जी वस्तू येईल त्यावर एक गाणे सादर करायचे असा खेळ घेतला. खूपच मजा आली. डॉ. जकलिना झाडांची माहिती आहे हे माहिती होते पण भरपूर गाणीही तोंडपाठ आहेत हे आज कळले. आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे ग्रीन अंब्रेला ह्या संस्थेच्या वसई पश्चिम येथील नर्सरीत पाच वाजता पोहोचलो. डॉ. रेखा नाईक यांनी ग्रीन अंब्रेला संस्थेची माहिती दिली. नर्सरीसाठी मोठी जागा हवी असल्याचे कळले. एवढे होते तोपर्यंत गोम्स गरमागरम वडापाव आणि चहा घेऊन आला. नालासोपारा येथील माझा नेल्कोमधील मित्र विलास अल्मेडा ह्याला मी आधीच ऑर्डर देऊन ठेवली होती, गोम्स त्याचा नेहमीचा वडेवाला. खान-पान झाल्यावर आम्ही काही जणांनी नर्सरीमधून अर्जुन, बकुळ, बहवा, अगस्ता,काजू अशी जरा हटके झाडे घेतली. मी बागेसाठी झाडे घेतोय म्हंटल्यावर प्रवीण खाडिलकर म्हणाला, ह्या झाडांचे पैसे माझ्याकडून, आणखी राऊंड फिगर करून ग्रीन अंब्रेलाला देणगीही दिली. खरंच आपण एक पाऊल पुढे टाकावे की अनेक हात आपोआप जोडले जातात. तसे ह्या नर्सरीच्या बाजूला ग्रीन गार्डन नर्सरिही होती, पण वेळेत गोरेगाव गाठायचे म्हणून मी जरा हार्ष होऊन शिट्या मारून लोकांना बसकडे पिटाळले, श्रीधरने माझा ओरडा खाल्ला पण त्याला हवेसे असणारे सोनचाफ्याचे कलम घेऊन आलाच. सोनचाफा ग्रुप चा लीडर ना तो. ६.१५ च्या सुमारास वसई सोडले. आज आम्हाला तसे कुठेच ट्रॅफिक लागत नव्हते , त्यामुळे बस सुसाट होती, बहुधा चालकालाही ( प्रमोद यादव) घरी जायची घाई झाली होती. ७.३० च्या सुमारास आम्ही स्नॅक्सचा शेवटचा हप्ता ( भडंग, चिक्की व ज्यूस) दिला. उरलेल्या फुले आणि भाज्यांची बियाणीही वाटली. गुगल मॅप प्रमाणे तासभर शिल्लक होता. ज्यांना आपले गळे साफ करायचे होते त्यांना शेवटची संधी होती, आम्ही श्रीला आग्रह केला आणि त्याने दोनतीन गाणी म्हटली. 'समुंदर मे नहाकर और भी ' हे शेवटचे गाणे म्हणजे सहलीला लागलेलं चार चाँदच ! सहज व्हॉट्स ॲप कडे लक्ष गेले तर शोभना जोशींचा मेसेज होता ' जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या शुभेच्छा !'. थोडक्यात आमचा सहलीचा योग छान जुळून आला होता, कळत नकळत पूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात व निसर्गाची ( झाडे, पशू पक्षी, शेती) भरपूर नवीन माहिती मिळवण्यात झकास गेला. ©️ अजित वर्तक, गोपू. HSS - हरित, स्वच्छ , सुरक्षित गोरेगाव. ८०९७७९६०७०

2 comments

No comments yet