संजीवनी परिवार- वृक्ष वाढदिवस
“वृक्ष लागवडीचा संस्कार रिचर्ड बेकर यांनी रुजवला.”-- वीणाताई गवाणकर माझं बालपण गावामध्ये गेल्यामुळे लहानपणापासूनच मला पर्यावरणा विषयी जीज्ञासा, आवड होती, त्यामुळेच पक्षीतज्ज्ञ सलीम अली, पाणी पंचायतावाले विलास साळुंखे, एक होता कार्व्हर आणि आता अवघा देहची वृक्ष झाला हे रिचर्ड बेकर याचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली. असे प्रतिपादन श्रीमती वीणाताई गवाणकर यांनी सामवेद भवन, उमराळे येथे संजीवनी परिवार आयोजित वृक्षांचा वाढदिवस कार्यक्रमात केले. रिचर्ड बेकर यांनी आफ्रिकी जन जीवनात वृक्ष लागवडीचा संस्कार कसा रुजवला याची कथा सांगून वृक्ष लावणे हे जीवनाचं अंग बनवल्याचं व वाळवंटात जंगल रुजवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. या कार्यक्रमासाठी संजीवनी वनराई चे प्रणेते श्री सायनेकर सर , माई खास ठाण्यावरून आले होते. सर म्हणाले आपल्या संस्कृतीत, साहित्यात वेदापासून वृक्षाचं महत्व सांगितलं आहे. वृक्ष म्हटला कि त्या बरोबर पक्षी व इतर परिसंस्था येतात असे सांगून वृक्षांवर प्रेम करा, त्यांची निगा ठेवा असा संदेश दिला. रविवार दिनांक ०७/०६/२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सुरवातीला श्रीमती वीणाताई, सायनेकर सर, माई यांच्या हस्ते सामवेद भवन परिसरात अमलताश/ बहावा, कदंब वृक्षाचं रोपण करण्यात आलं. सकाळी पहाटे संजीवनी वनराई निर्मळ मंदिर परिसराला भेट देऊन १९ व्या वाढदिवसाच्या वृक्षांना परिवाराने शुभेच्छा दिल्या, कृतज्ञता व्यक्त केली.
