Abhijit Deshpande
Abhijit DeshpandeModerator
2y ago

वसुंधरेला ‘संजीवनी’ देणारी संस्था

समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ ही भा.रा. तांबेंच्या कवितेतील ओळ. ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड जिल्ह्यांतील स्थानिकांची काही वर्षांपूर्वी अगदी हीच स्थिती झाली होती. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, भातसा आणि वैतरणा हे तीन मोठे तलाव या भागात आहेत. त्यात या भागात सरासरी 2500 मि.मी. पाऊस पडतो. पण नियोजन नसल्याने येथील पावसाचे पाणी वाहून जात होते आणि तलावांचे पाणी मुंबईकडे येत होते. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारा स्थानिक जनजाती व ग्रामीण समाज उरलेले आठ महिने पाण्यापासून वंचित हे येथील वास्तव झाले होते. हे मोठे तलावक्षेत्र असूनही स्थानिक महिलांना डोक्यावर हंडे घेऊन मैलोनमैल चालत गरजेपुरते पाणी आणावे लागे, तेदेखील हवे तेवढे मिळत नसे व त्यांच्या, मुलांच्या आरोग्यावर, शिक्षणावर व एकूणच कुटुंबस्वास्थ्यावर या सगळ्याचा परिणाम होऊ लागला. यावर काहीतरी सबळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली होती. ठाण्यातील आनंद भागवतकाकांना ही गरज जाणवली. त्यांच्या व समविचारी नागरिकांच्या माध्यमातून 2016 साली उभी राहिली ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ ही सेवाभावी संस्था. कंपनी अ‍ॅक्टच्या कलम 8खाली एप्रिल 2016मध्ये ही संस्था नोंदणीकृत झालेली आहे. सामाजिक जाणिवेला व कर्तव्यभावनेला वयाचे बंधन नाही, हे जाणवते ते आज नव्वदीत असणार्‍या भागवतकाकांच्या धडपडीतून. आज त्यांच्या ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ या संस्थेच्या प्रयत्नातून शहापूर व मुरबाडमध्ये सेहेचाळीस कोटी लीटर पाण्याचे साठे तयार झाले आहेत. पाणीवाले काका म्हणून विख्यात झालेले आनंद भागवत यांच्याकडून आम्ही या संस्थेच्या एकूण कार्याची व प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. vivek मुळात संस्थेने हाच भूभाग आपल्या कामासाठी का निवडला, हे समजून घेणे आवश्यक आहे. कठोर दुष्काळी परिस्थितीला तोंड देणार्‍या या भागात वास्तविक अनेक महत्त्वाचे तलाव, बारा नद्या आणि दीडशे जलप्रवाह आहेत. पाचशेहून अधिक नैसर्गिक तलाव आणि पन्नासहून अधिक मानवनिर्मित तलाव आहेत. या मानवनिर्मित पाझर तलावांची क्षमता तीस कोटी लीटर पाणी साठू शकेल अशी आहे. पण मग, एवढे स्रोत असूनही या क्षेत्रात प्यायलाही पाणी नाही अशी स्थिती का बरे निर्माण व्हावी? कारण यातल्या अधिकांश तलावांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ तयार झाला होता. अनेक वर्षांत त्यांच्या स्वच्छतेसाठी जराही काम करण्यात आले नाही. त्यामुळे ज्या तलावात एक कोटी लीटर पाणी साठायला पाहिजे, तिथे जेमतेम दहा लाख लीटर पाणीच साठू शकते, अशी अवस्था निर्माण झाली होती. बिघडलेले पाणीप्रश्न आणि शोधलेली उत्तरे या भागातील बिघडलेला भूगर्भजलस्तर हा येथील एक मोठा प्रश्न आहे. ‘बोअरवेल सबसिडी’च्या राजकारणामुळे बोअर खणून उपसा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले. सुरुवातीला काही काळ बोअरवेलला चांगले पाणी येते. पण त्यातील पाणी संपले की तिथे पोकळी तयार होते. या पोकळ्या एक ते दीड कोटी लीटर पाण्याची साठवण होईल इतक्या क्षमतेच्या आहेत. आपल्याला समुद्र जवळ आहे, त्यामुळे आजूबाजूच्या भागातले खारे पाणी वाहत येत जमिनीखालच्या या जलविरहित पोकळीत भरले जाते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात पिण्यायोग्य तसेच स्वयंपाकास, शेतीस उपयुक्त ठरेल असे गोडे पाणी मिळाल्यानंतर काही काळाने मात्र तेथे उपशाला खारे पाणी लागते, जे पिण्यायोग्यही नसते व शेती-स्वयंपाकासही चालणारे नसते. जमिनीतील पोकळीत समुद्राचे पाणी शिरल्याने मातीचा कसही बिघडतो. वास्तविक ऐंशी फुटांपेक्षा खोल बोअरवेल असू नयेत असा नियम आहे. पण या भागात काही ठिकाणी 150-200, क्वचित 800 फूट खोलवर गेलेल्याही बोअरवेल आहेत. या व अशा अनेक कारणांमुळे शहापूर व मुरबाड तालुक्यात पाण्याच्या समस्येने अत्यंत भयंकर रूप धारण केले होते. thane 2016 साली स्थापन झालेल्या वसुंधरा संजीवनी मंडळाने दोन स्तरांवर आपले काम सुरू केले - एक म्हणजे पाण्याच्या सद्यकालीन समस्येवर काम करणे आणि दुसरे पुढच्या पिढीपुढे उभ्या असणार्‍या समस्यांचे निराकरण करणे. दुहेरी व्हिजनने संस्थेचे काम सुरू झाले. एक चेक डॅम बांधला की पाण्याची साठवण होतेच, शेतीलाही पाणी मिळते, जमिनीत मुरल्याने ओलावा तयार होतोे. गेल्या आठ वर्षांत संस्थेच्या माध्यमातून असे एकूण 23 चेक डॅम म्हणजेच काँक्रीटचे बंधारे बांधण्यात आले. 47 तलाव गाळमुक्त करण्यात आले. एकूण 14 शेततळी तयार करण्यात आली. 21 ठिकाणी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यात आले. या सगळ्या उपक्रमांमुळे या भूभागात संस्थेला 45 लाख कोटी लीटर पाण्याचा संचय करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे संस्थेने तयार केलेल्या अनेक शेततळ्यांवर सौर ऊर्जा निर्मिती संच बसवण्यात आले आहेत. याद्वारे उत्पादित होणार्‍या सौर ऊर्जेच्या साहाय्यानेच शेतांना पाणीपुरवठा करण्यात येतो. म्हणजे पाणीबचतही होते आणि ऊर्जाबचतही. वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून 2022मध्ये आणखी एक मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला, तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात छपरावरील पावसाच्या पाण्याचा संचय व त्याचे जमिनीत पुनर्भरण. छतावर जमा होणारे पावसाचे पाणी पन्हळ लावून गोळा केले जाते. फिल्टर लावून त्याचे शुद्धीकरण केले जाते व बोअरवेलला जोडणी केलेल्या पाइपद्वारे ते जमिनीतील पोकळीत भरले जाते. याला इंग्लिशमध्ये ‘रिचार्जिंग ऑफ बोअरवेल’ म्हटले जाते. या पर्जन्यजल संचय व बोअरवेल पुनर्भरणामुळे खारे पाणी जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहेच, त्याचप्रमाणे बोअरवेल्सना अखंड पाणीही येते. त्यामुळे घरोघरी पाण्याचा पुरवठा होतो व अनेक गावे आज टँकरमुक्त झाली आहे. गावागावात आर्थिक-सामाजिक परिवर्तन घडून आले. स्थलांतरे रोखण्यास फार मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईमुळे शाळेचा पट अतिशय खालावला होता. विशेषत: मुलींचा पट अधिक रोडावला होता. याचे कारण घरातील मोठ्या स्त्रिया पाणी भरायला गेल्या की भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी या मुलींवर येत असे. त्यात शाळेतही पेयजल व स्वच्छतागृहासाठी पाणी अभावानेच असे. त्यामुळे धाकट्यांना सांभाळणे आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर विद्यार्थिनींची संख्या रोडावण्याचा प्रश्न प्रखर झाला. वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून गावे टँकरमुक्त झाली. त्यामुळे स्त्रियांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण संपली. आणि अनेक शाळांच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा संच बसवल्याने शाळेतला पाणीप्रश्न सुटला व शाळांचा हजेरीपट सुधारला.

1 comments

No comments yet