संकलित ई - कचऱ्यामधून दुरुस्त केलेले संगणक गरजू वसतीगृहांना भेट
संकलित ई - कचऱ्यामधून दुरुस्त केलेले संगणक गरजू वसतीगृहांना भेट निगडी दि. १ फेब्रुवारी - दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरण संरक्षण गतिविधि, पूर्णम इको व्हिजन फौंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शहरातील विविध पर्यावरण संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) ~ई यंत्रण २०२४ ~ ई कचरा संकलन व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. शहरामध्ये एक दिवसात ७२ संकलन केंद्रामधून सुमारे २१०० किलो ई कचरा जमा करण्यात आला. या मोहिमेत ११५ कार्यकर्त्यांनी काम केले तर २६५ पेक्षा जास्त लोकांनी ई कचरा जमा करून सहभाग नोंदविला. या मोहिमेत व वेळोवेळी संस्थेकडे जमा झालेला इ- कचरा म्हणजेच मोबाईल, टि.व्ही. संगणक सर्व प्रकारची विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपरणे दुरुस्त करुन गरजू संस्थांना वितरित केली जातात. अशाच प्रकारे जमा झालेले नऊ संगणक संच दुरुस्त करून बुधवारी झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या पाच निवासी वसतिगृहांना देण्यात आले. भास्कर रिकामे यांनी या वसतीगृहांचा कार्यपरिचय करुन दिला. १) संजीवनी मुलींचे वसतिगृह (३८ मुली)- तळेगांव दाभाडे - ०२ संगणक २) गोपाळ नवजीवन केंद्र - वडगांव मावळ वनवासी विद्यार्थी वसतिगृह (५० मुले) - ०२ संगणक ३) स्वामी विवेकानंद वनवासी विद्यार्थी वसतिगृह - राजगुरू नगर ( ४५ मुले) - ०२ संगणक ४) जनजाती कल्याण आश्रम, अकोले, नगर (४८ मुले) - ०२ संगणक ५) शबरीमाता कन्या छात्रावस कनाशी, नाशिक (५५ मुली) - ०१ संगणक यावेळी वसतिगृहाचे पालक दिलीप देशपांडे, आसावरी बुधकर, माणिक कुलकर्णी, सावरकर मंडळाचे श्रीकांत मापारी, रमेश बनगोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुर्णम इकोव्हिजन चे राजेश मणेरीकर यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले "वाढत्या औद्योगिकरणामुळे तसेच दैनंदिन घरगुती उपकरणांच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या ई कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. घरात जमा होणारी नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल, इ. चे काय करायचे हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे, यावर उपाय म्हणून अशा प्रकारच्या मोहिमा राबविण्यात येतात. यामध्ये जमा होणाऱ्या वस्तुंचा पुनर्वापर केला जातो किंवा शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जाते." यावेळी व्यासपीठावर पर्यावरण गतिविधिचे प्रमुख रमेश करपे, निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे उपस्थित होते. ई-यंत्रम मोहीमेचे प्रमुख मनेश म्हस्के यांनी आपल्या प्रास्ताविकांत ई कचरा संकलन व जनजागृती अभियानाचा आढावा घेतला. त्याबरोबरच मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व पिंपरी चिंचवडकरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुधीर मारूळकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली . पर्यावरण संरक्षणासाठीचे ईश्वरीय कार्य केल्यानंतर , अनुभवकथना सोबतच या कार्यक्रमात श्रमपरिहार म्हणून , गोविंद धाम इस्कॉन मंदिर , रावेत ,च्या वतीने सर्वांना प्रसादाची खिचडी देण्यात आली .
